बुलढाणा–देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश पदी विराजमान असलेल्या भूषण गवई यांच्या दिशेने बुट फेकून एका माथे फिरू वकिलाकडून हल्ला करण्यात आला.गेल्या सहा ऑक्टोबर २०२५ रोजी देशाच्या न्यायव्यवस्थेला काळिमा लावणारी ही घटना घडली. या घटनेचा निषेध म्हणून सतीश पवार जिल्हाध्यक्ष भीम आर्मी बुलढाणा यांच्या नेतृत्वात भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन 17 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा या ठिकाणी करण्यात आलेले आहे. या जन आक्रोश मोर्चामध्ये हल्ला करणाऱ्या माथेफिरू व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, हल्ला झाला तो दिवस म्हणजेच सहा ऑक्टोबर हा न्यायव्यवस्थेतील काळा दिवस म्हणून जाहीर करण्यात यावे, देशातील प्रत्येक न्यायालयासमोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हातामध्ये संविधान असलेले पूर्णाकृती पुतळे उभारण्यात यावेत, न्याय पालिकेतील न्यायाधीशांना झेड दर्जा प्राप्त संरक्षण देण्यात यावेत, इत्यादी मागण्यांचा समावेश असल्याचे पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलेले आहे. हल्ला केवळ सरन्यायाधीशावर नसून देशाच्या संविधानावर असल्याचे देखील मत व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे ही लढाई देशातील प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी असल्याने सर्व संविधान वादी व पुरोगामी पक्ष संघटनांनी मोठ्या संख्येने या जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सतीश पवार यांच्याकडून करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments